संत जगनाळे महाराज चौकातील झाडाच्या निर्जीव फांद्यांमुळे अपघाताचा धोका; प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा
आमगांव : संत जगनाळे महाराज चौकातील ६३ वर्षीय कडुलिंबाच्या झाडावर काही महिन्यांपूर्वी वीज कोसळल्याने काही फांद्या निर्जीव झाल्या आहेत. या फांद्या कधीही तुटून खाली पडण्याचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील मेन रोड़वरील संत जगनाळे महाराज चौकात कडुलिंबाचे झाड उभे आहे, ज्यावर काही महिन्यांपूर्वी वीज कोसळली होती. या घटनेमुळे झाडाच्या काही फांद्या निर्जीव व कमजोर झाल्या आहेत. सध्या या फांद्या कधीही तुटून खाली पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे वाटसरूंच्या जीवाला मोठा धोका आहे.
या भागातून दररोज हजारों लोकांची वर्दळ होते. बाजारपेठेमुळे नागरिक, दुकानदार, पादचारी, आणि दुचाकीस्वार या मार्गाचा नियमित वापर करतात. निर्जीव फांद्या कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी प्रशासनाकडे या झाडाच्या फांद्या तातडीने कापण्याची मागणी केली आहे.
स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांनी सांगितले की, “याआधीच वीज कोसळल्याने झाडाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने योग्य वेळी पावले उचलली नाहीत, तर मोठा अपघात होऊ शकतो.”
या भागातील नागरिकांनी प्रशासनाला घटनास्थळाची त्वरित पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी निर्जीव फांद्या कापून परिसर सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

