विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक प्रतिभेला दाद; पालक-शिक्षकांमध्ये अभिमानाची भावना
गोंदिया : येथील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी स्कूल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन 2025 मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरे करण्यात आले. चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कौशल्यांचा उत्स्फूर्त सादरीकरण झाला. सोहळ्यात पालक, शिक्षक आणि मान्यवरांचा लक्षणीय सहभाग होता.
सोहळ्याचा शुभारंभ दि.6 जानेवारी रोजी मा. कु. पूजा सरूळकर (PSI, प्रमुख, दामिनी पथक) यांच्या हस्ते करण्यात आला. मा.सी. ए. राणे (प्रशासकीय अधिकारी, न.प. गोंदिया) अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून मा. श्रीमती भावना कदम (माजी पार्षद) उपस्थित होत्या.
7 आणि 8 जानेवारीला विद्यार्थी कलागुणांचे दर्शन घडले. शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, वाद्यवृंद आणि गाण्यांतून प्रेक्षकांची मने जिंकली, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कार व सामूहिक गाण्यांनी सभागृह दादांच्या गजरात दणाणून गेले.
9 जानेवारीला समारोप सोहळ्याला मा. सतीश खंडेलवाल (सेवानिवृत्त प्रधानाध्यापक) अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे मा. डॉ. दर्पण चौधरी (युनायटेड हॉस्पिटल) व डॉ. प्रमेश गायधने (होप हॉस्पिटल) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले.
प्रमुख पाहुणे व प्रधानाध्यापक यांची प्रतिक्रिया:
“होप म्हणजे फक्त एक शब्द नाही, तर ते जीवनाचा आधार आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरी सकारात्मक दृष्टिकोन आणि आशावाद हेच यशाचे मूळ आहेत. आज कष्ट केले तर उद्याचे भविष्य गोड होईल. मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या संगतीने तुम्ही कोणतीही उंची गाठू शकता.”
– डॉ. प्रमेश गायधने (होप हॉस्पिटल)“प्रामाणिकपणे मेहनत आणि सातत्य याशिवाय यश मिळणे शक्य नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवून कष्टांची तयारी ठेवली पाहिजे. मी या मंचावर उभा राहण्यासाठी 20 वर्षे कष्ट घेतले आहेत. तुम्हीही अशीच मेहनत करून भविष्यात मोठ्या यशासाठी स्वतःला सिद्ध करू शकता.”
– डॉ. दर्पण चौधरी (युनायटेड हॉस्पिटल)“विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. माजी विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे ही शाळेची खरी ताकद आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतो.”
– प्रधानाध्यापक,भुवनकुमार बिसेन
या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रधानाध्यापक भुवनकुमार बिसेन, प्राचार्य राजेश डिसूजा, पर्यवेक्षक संजय नालमवार, प्रभारी रविशंकर बिसेन, सुधीर राहंगडाले,भोजराज मेंढे स्नेह सम्मेलन प्रभारी (माध्यमिक)आणि संपूर्ण शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची कलात्मक कौशल्ये विकसित होतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या स्नेह सम्मेलनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक संस्मरणीय अध्याय जोडला.

