सभासदांचे भाग भांडवल कर्जात वळवण्याच्या आदेशाला विरोध ; आंदोलनात्मक कृतीसाठी संघटनांचे निर्धार
आमगांव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदियाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सभासदांचे भांडवल कर्जात जमा करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाविरोधात आमगाव तालुक्यातील सहकारी संस्थांनी आक्रमक भूमिका घेत, संचालकांला घेराव घालण्याचा निर्णय आणि बँकेवर दबाव टाकण्याचा ठराव केला आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सभासदांचे भाग भांडवल बँकेच्या कर्जात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेच्या या निर्णयाला नियमबाह्य आणि बेकायदेशीर ठरवत, आमगाव तालुक्यातील ४८ संस्थांच्या अध्यक्ष व गटसचिवांनी संघटनेच्या तालुकाध्यक्ष प्रल्हाद वंजारी यांच्या निवासस्थानी सभा घेतली. ही सभा ११ जानेवारी रोजी बोथली येथे संपन्न झाली.
सभेत निर्णय घेण्यात आला की, बँकेच्या या आदेशाचा निषेध करण्यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर जिल्हा बँकेत निवडून आलेल्या संचालकांला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गोंदिया येथील बँकेच्या मुख्यालयावर अध्यक्ष आणि सरव्यवस्थापकांना घेराव घालून, आदेश रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात येईल.
सभेचे अध्यक्षपद सहकार महर्षी सुभाष आकरे यांनी भूषवले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डोमाजी बोपचे यांनी सभेला मार्गदर्शन केले. यावेळी प्यारेलाल गौतम, बालाजी बिसेन, खुमेश कटरे, विद्यासागर पारधी, दर्शन सिंग बेदी, अजय बिसेन, चंद्रपाल राहंगडाले, घनश्याम कटरे, टेकचंद टेंभरे तसेच गटसचिव दोनोडे, गोंडाने, महारवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या निर्णयाविरोधात संघटनात्मक ताकद उभारण्याचे ठरवले. सभासदांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाला समर्थन दिले जाणार नाही, असा ठाम निर्धार या बैठकीत करण्यात आला.
संघटनेने स्पष्ट केले की, बँकेचा हा निर्णय नियमबाह्य असून, तो रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सभासदांचे हक्क आणि संस्थांची स्वायत्तता टिकवण्यासाठी संवैधानिक मार्गाने संघर्ष करण्याची तयारी संघटनेनी दर्शवली आहे.

