
अहेरी /प्रतिनिधी
सोमवार, १३ जानेवारी रोजी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी पंचायत समितीच्या प्रांगणात पंचायत समितीची वार्षिक आमसभा पार पडली. यावेळी त्यांनी विविध विभाग प्रमुखांना प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या वार्षिक आमसभेला प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, अहेरीचे गटविकास अधिकारी राहुल वरठे, नायब तहसीलदार गुणवंत वाबिटकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे, राकाँचे कार्याध्यक्ष रियाज शेख, नगराध्यक्ष रोजा करपेत,नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, रामेश्वरबाबा आत्राम, राकाँ तालुकाध्यक्ष नागेश मडावी आदी उपस्थित होते.आमसभेत जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे, ग्रामीण पाणी पुरावठा विभागाचे ढिसाळ नियोजन, जिल्हा परिषद उपविभाग अंतर्गत सुरू असलेले निकृष्ट आणि रखडलेले बांधकाम, ग्रामीण रस्ते, रखडलेले घरकुल, ग्रामीण भागात अनियमित असलेली बससेवा, खडतर रस्ते, जमिनीचे पट्टे, अहेरी येथील मामा तलावाभोवती झालेले अतिक्रमण आदी विषयांवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.


