विदर्भातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी: भारतीय किसान संघाचे निवेदन

0
84

आमगाव : आज दिनांक 16/01/2025 रोजी गुरुवार, भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांताच्या वतीने आमगाव तालुक्यात तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. ओला दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान आणि विमा कंपन्यांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारकडून त्वरीत कार्यवाही करण्याचा आग्रह भारतीय किसान संघाने केला आहे.

विदर्भात सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आणि ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उरलेले पीक देखील नष्ट झाले. भारतीय किसान संघाने विदर्भाला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. संघाने विनंती केली की शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत प्रदान केली जावी आणि राज्य सरकारकडून त्वरित निर्णय घेतला जावा.

शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तक्रारी नोंदवल्या असल्या तरी अजून त्यांचे पंचनामे केलेले नाहीत. 2023-24 हंगामातील खरीप व रब्बी हंगामातील पिक विमा अद्याप दिला गेला नाही. भारतीय किसान संघाने विमा कंपन्यांना आदेश देण्याची मागणी केली आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता मांडली आहे.

आजच्या निवेदन देणाऱ्या कार्यक्रमात भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांताचे प्रमुख आणि कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जी. एम. येळे , कैलाश जी कटरे , हिवराज जी मेंढे , मधुकर जी पटले , बेनीराम कटरे, हौसलाल राहागडाले, बेनेश्वर जी कटरे तसेच आमगाव तालुका कार्यकारणीचे इतर सदस्य उपस्थित होते.

भारतीय किसान संघाचे ठाम मत आहे की, विदर्भातील शेतकऱ्यांना त्वरित मदत आणि विमा वितरण मिळावे, यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी या समस्येवर लगेच तोडगा काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.