जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : पिता-पुत्राला ५ वर्षे सश्रम कारावास

0
1066

गोंदिया न्यायालयाचा ठोस निर्णय: शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाच्या वादातून झालेल्या हल्ल्याचा निकाल

गोंदिया, (१७ जाने) : मा. ए.टी. वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांनी आज सुरेश सदाशिव लांजेवार (वय ५७) व त्याचा मुलगा मानिक सुरेश लांजेवार (वय २५), दोन्ही रा. हेटी (गिरोला), ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया यांना प्रत्येकी ५ वर्षांचा सश्रम कारावास व ₹५,०००/- दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येकी ४ महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

२६ जून २०१७ रोजी ग्रामपंचायत हेटी व तंटामुक्त समिती हेटी यांच्या संयुक्त सभेत तुकाराम ईसरू लांजेवार (वय ७०) यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान २७ जून २०१७ रोजी सकाळी ८ वाजता तुकाराम लांजेवार यांच्यावर प्राणघातक हल्ल्यात झाले.

हल्ल्यादरम्यान, सुरेश लांजेवार, मानिक लांजेवार व सुरेशची पत्नी ललिता लांजेवार यांनी कु-हाडी, लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी तुकाराम यांना मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तुकाराम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तुकाराम यांचा भाऊ नामदेव ईसरू लांजेवार (वय ६५) यांनी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार दाखल केली. तपास अधिकारी निशा वानखेडे यांनी तपास करून सुरेश, मानिक आणि ललिता लांजेवार यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०७ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

जिल्हा सरकारी वकील  महेश चंदवानी यांनी आरोपींविरुद्ध ११ साक्षीदार व महत्त्वपूर्ण कागदोपत्री पुरावे सादर केले. अतिरिक्त सरकारी वकील  कृष्णा डी. पारधी यांनी सविस्तर युक्तिवाद करून आरोपींच्या दोषीपणाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला.

सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून मा. न्यायालयाने सुरेश व मानिक लांजेवार यांना दोषी ठरवले आणि ५ वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
मात्र, आरोपी ललिता लांजेवार हिला पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  मंगेश काळे आणि पैरवी कर्मचारी सुनिल मेश्राम यांनी तपास प्रक्रिया प्रभावीपणे हाताळली.

 

 

Previous articleतिरोडा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी हुपराज जमईवार प्रबळ दावेदार
Next articleभूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या : पालडोंगरीतील शेतकऱ्यांची मागणी