

आमगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे १५ ते १८ जानेवारी २०२४ दरम्यान राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंनी आपली कौशल्ये आजमावली.
कनक सावसाकडेला कांस्य पदकाने सन्मानित
या प्रतिष्ठित स्पर्धेत के. के. इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या कनक सावसाकडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. तिच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून ती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
कनकने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर, कार्यकारी डॉ. संघी सर, मुख्याध्यापिका रिना भुते मॅडम तसेच तिच्या आई-वडिलांना दिले. तिच्या कामगिरीमुळे शिक्षक व पालकांचा अभिमान दुणावला आहे.
कनकच्या या कामगिरीनंतर शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय स्तरावर केलेली ही कामगिरी शालेय क्रीडाजगतात एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.






