गोंदिया जिल्ह्यातील 60 शिक्षकांचा STEM शिक्षण क्षेत्रात सहभाग
गोंदिया, (दि. 22 जाने) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (SCERTM), भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे (IISER Pune), व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विज्ञान व गणित कॅस्केड कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले. 20 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 60 विज्ञान व गणित शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यशाळा IRISE (Innovation in Research and STEM Education) उपक्रमांतर्गत घेण्यात आली. STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व गणित) शिक्षणातील नवोपक्रम, मूल्यमापन तंत्रे, आणि शैक्षणिक कौशल्यवृद्धीसाठी शिक्षकांना या उपक्रमाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत सहभागी शिक्षकांना सर्जनशीलता आणि समस्यांवरील नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी प्रेरणा देण्यात आली. सात इनोव्हेशन मॉडेल्स, शैक्षणिक तंत्रे, आणि STEM शिक्षणाच्या महत्त्वावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख प्रशिक्षक आय सी असीम बॅनर्जी, संजय कटरे, मनोज पंधरे, व IRISE टीमच्या पंकज यादव यांनी व्याख्यान दिले.
कार्यशाळेचे आयोजन विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार; IISER पुणे; ब्रिटिश कौन्सिल; रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री; व टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्याने करण्यात आले.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी डाएट गोंदियाचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य आणि अधिव्याख्याता डॉ. भाऊराव राठोड यांचे मोलाचे योगदान होते. संचालन व व्यवस्थापनाची जबाबदारी विषय साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे व मंगला बडवाईक यांनी सांभाळली.
कार्यशाळेच्या समारोप सत्रात सहभागी शिक्षक व सुलभकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यशाळेने गोंदिया जिल्ह्यातील STEM शिक्षणाला एक नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.

