आंतरराष्ट्रीय सहकार गोंदियात उद्या सहकार चळवळीचा महत्त्वपूर्ण सोहळा

0
79

कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड येथे आयोजन

शेतकरी व सहकार चळवळीला मिळणार प्रोत्साहन

गोंदिया: महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभाग, अशोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन्स, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गोंदियातील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड येथे उद्या (२४ जानेवारी) आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सुभाष आकरे (संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन) सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करतील. कार्यक्रमाचे समन्वयक राजूदास जाधव असतील.

या कार्यक्रमाद्वारे सहकार क्षेत्रातील भरीव कार्याची माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी, सहकारी पतसंस्था, ग्रामीण सहकारी संस्था आणि नागरिकांसाठी सहकार क्षेत्राने दिलेली मदत व उन्नती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. या परिषदेमुळे शेतकरी व सहकार क्षेत्रातील व्यक्तींना नवे प्रेरणास्रोत मिळण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, तसेच पगारदार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
निमंत्रक प्रा. सुभाष आकरे, काशीराम हुकरे, दामोदर रहांगडाले, संजय किंदरले, भास्कर धरम सहारे, देवकुमार झरारिया, यादवराव पंचमवार, भोगेलाल बोलणे, सुखचंद राऊत, दामोदर नेवारे, उषाताई असाटी व प्रमोद संगीडवार यांनी सहकार चळवळीत योगदान देण्यासाठी सर्व स्तरांवरील लोकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.

उद्या होणाऱ्या या परिषदेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहा व सहकार चळवळीला नवे बळ द्या!