राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन
गोंदिया : एन.एम.डी. महाविद्यालयाच्या आडिटोरियममध्ये आज जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या सत्कारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष सुरेश हर्षे, सभापती सौ. आम्रपाली डोंगरवार, उपसभापती शिवलाल जमरे यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन होते.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध सेल व आघाड्यांचे अध्यक्ष, महिला व युवक कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, “खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांसाठी शेतीला पूरक व्यवसाय व सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केले जाईल. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही मी देतो.”
माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले की, “खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पक्षाचे संघटन अधिक मजबूत झाले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सतत प्रगती करत आहे.”
आमदार राजकुमार बडोले म्हणाले, “खा. प्रफुल पटेल यांचे नेतृत्व हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी नवे व्हिजन आणि दृष्टीकोन दिले आहेत. निवडणुकीत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो.”

