
प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचे डॉ. बघेले यांचे आवाहन
गोरेगांव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसेटोला येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. घनश्याम बघेले, प्राचार्य मातोश्री सोनाबाई गोस्वामी महाविद्यालय, तेढा, होते. उद्घाटन सौ. चित्रलेखाताई चौधरी, सभापती पंचायत समिती गोरेगाव यांच्या हस्ते झाले, तर दीपप्रज्वलनाचे कार्य रामेश्वर महारवाडे, उपसभापती पंचायत समिती गोरेगाव, यांनी केले. उपाध्यक्ष अँड. कृष्णा पारधी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकही यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये गावातील कर्तबगार ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. घनश्याम बघेले यांनी सर्जनशीलतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले, “प्रत्येक व्यक्तीत निसर्गाने किंवा ईश्वराने काही ना काही सद्गुण प्रदान केले आहेत. योग्य पोषक वातावरण व संवर्धन मिळाल्यास मुलांची सर्जनशीलता विकसित होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.” पालकांनी मुलांना स्वयंस्फूर्तीने काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि त्यांची इतरांशी तुलना करू नये, असे त्यांनी सांगितले.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. यासाठी शाळेची स्वयंसेवक कु. दीप्ती पारधी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमाचे संचालन एम. टी. कटरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक डी. डी. बिसेन सर यांनी मानले.
कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या कला व सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये नवीन ऊर्जा व प्रेरणा निर्माण केली.


