“मेरी बेटी, मेरा अभिमान” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

0
280

आमगाव :  श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर डी. फार्मसी कॉलेज, रिसामा येथे अमेच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन व राष्ट्रसेविका समिती, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “मेरी बेटी, मेरा अभिमान” या उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.के. संघी होते. उद्घाटन मा. सौ. सविताताई संजय पुराम, (सभापती, महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. योगिताताई पुंड (सभापती, पंचायत समिती, आमगाव), मा. सौ. सुनंदाताई उके (उपसभापती, पंचायत समिती, आमगाव), महेश उके (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, आमगाव), मा. सौ. स्नेहाताई मानकर, विनायक अंजनकर, पोलिस उपनिरीक्षक  अक्षय वडसे पाटील, अनिल मुंजे, रामेंद्र बावनकर, नरेंद्र कावडे, सौ. मुंजे मॅडम, अटरे आणि आयोजक  हेमंत चावके, अजित सव्वालाखे, चव्हाण, कोमल रहीले आदी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत आमगाव शहरातील 15 शाळा व महाविद्यालयांतील मुलींना 8 दिवस आत्मसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, गुड टच – बॅड टच या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या खेळाडूंचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. आमगावमधील विविध शाळांनी या अभियानाला भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थिनींनी आत्मसुरक्षेच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मने जिंकली.

“मेरी बेटी, मेरा अभिमान” या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रसेविका समिती आणि अमेच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. अवधूत मुंजे व डॉ. राहुल बिसेन यांनी या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाचे आयोजक  हेमंतकुमार चावके यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.