मेरिटोरियस पब्लिक स्कूलमध्ये “EXPRESSION – Waves of Meritorious” च्या भव्य उत्साहात स्नेहसंमेलन संपन्न

0
47

तिरोडा : मेरिटोरियस पब्लिक स्कूल, तिरोडा येथे दि.01 फेब्रूवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “EXPRESSION – Waves of Meritorious” या थीम अंतर्गत उत्साहात साजरे करण्यात आले.

या भव्य सोहळ्याला तिरोडा-गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, गोंदिया आमदार विनोद अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जितेंद्र रहांगडाले, संस्थेचे संचालक राधारमन अग्रवाल, शाळेचे संचालक मुकेश अग्रवाल आणि प्राचार्य तुषार येरपुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागताने झाली. प्राचार्य तुषार येरपुडे यांनी शाळेच्या शैक्षणिक आणि विविध उपक्रमांविषयी माहिती देत, मेरिटोरियस पब्लिक स्कूल जिल्ह्यात अग्रगण्य असल्याचे सांगितले.

आमदार विजय रहांगडाले यांनी शाळेच्या कार्याची प्रशंसा करत, संस्कृती जोपासणारी आणि मुल्याधिष्ठित शिक्षण देणारी शिक्षणसंस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. तर आमदार विनोद अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती टिकवून समृद्ध राष्ट्र घडविण्याचा संदेश दिला. तसेच, “कार्य असे करा की कीर्तिरूपे उरावे,” असे सांगत शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या स्नेहसंमेलनाची थीम “EXPRESSION – Waves of Meritorious” विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उलगडली. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत आणि कला प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले.

मुख्य आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या जीवनकार्यावर आधारित नृत्य सादरीकरण. यावेळी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले.

याशिवाय, विविध राज्यांच्या लोकनृत्यांपासून ते लघुनाटिकांपर्यंत रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक आणि अभिनयाच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दल, शेतकरी, कामगार, शिक्षक आणि पालक यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, सामाजिक जागृतीसाठी काही विशेष कार्यक्रम सादर करत पालकांना अंतर्मुख करणारे संदेश दिले.

या भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

“EXPRESSION – Waves of Meritorious” या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला तसेच पालक व उपस्थित मान्यवरांना संस्कार, शिक्षण आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ अनुभवण्याची संधी मिळाली.

 

Previous articleवसंत पंचमी महोत्सव को विशेष संदर्भ मा – क्षत्रिय पोवार समाज ला एक मार्मिक आवाहन
Next articleमियाम चॅरिटेबल ट्रस्ट कडून वडलापेठ येथे महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे