जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम..

0
76

प्रतिनिधी -अमोल कोलपाकवार

गडचिरोली दि.७ : जिल्ह्यात १० ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मुलचेरा या सात तालुक्यातील ७ लाख २२ हजार ४२३ पात्र नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्या देण्यात येणार आहेत. हत्तीरोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी औषधोपचार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी केले आहे.

हत्तीरोग संसर्ग रोखण्यासाठी डी.ई.सी., अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टीन या तीन औषधांची मात्रा उंचीनुसार आणि वयोगटानुसार दिली जाणार आहे. २ वर्षांखालील बालके, गर्भवती महिला आणि गंभीर आजारग्रस्त रुग्ण वगळता सर्व नागरिकांनी हत्तीरोगविरोधी गोळ्या सेवन कराव्यात. हत्तीरोगविरोधी गोळ्या सुरक्षीत असून त्या सेवन करणे हा हत्तीरोगापासूच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे डॉ. हेमके यांनी सांगितले.

१० ते २० फेब्रुवारी दरम्यान आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन पात्र नागरिकांना या गोळ्या देतील. तसेच २१ व २२ फेब्रुवारी रोजी आरोग्य संस्था, बस स्थानके, शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी ७२५ विशेष बूथ उभारून औषधोपचार केले जातील. मोहिमेदरम्यान वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी २४, २५, २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मॉप-अप फेरी घेण्यात येणार आहे.

या मोहिमेसाठी ३१०९ आरोग्य कर्मचारी आणि ३१३ पर्यवेक्षक कार्यरत असणार असून १५६५ पथकांद्वारे घरगुती भेटी दिल्या जातील.