गोंदिया जिल्हा परिषद विषय समिती निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व

0
1712

१३ विरुद्ध ३९ मतांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; राष्ट्रवादीला मोठा झटका

अर्जुनी मोरगाव मतदारसंघाला अध्यक्षासह दोन सभापतीपदे, सडक अर्जुनी व आमगाव तालुका वंचित

गोंदिया, दि. १०: जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली राजकीय ताकद सिद्ध करत चारही विषय समित्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आज (१० फेब्रुवारी) स्व. वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव केला.

भाजपच्या उमेदवारांना ३९ मते मिळाली (भाजप – २६, चाबी गट – ४, अपक्ष २ आणि राष्ट्रवादी– ८), तर काँग्रेसच्या उमेदवारांना केवळ १३ मते मिळाली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेत आपल्या तीन उमेदवारांचे अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपला थेट विजयाचा मार्ग मोकळा झाला.

 या निवडणुकीत मुंडीपार गटाचे डॉ. लक्ष्मण भगत, पिंडकेपार गटाच्या दीपा चंद्रिकापूरे, इटखेडा गटाच्या अपक्ष जि.प. सदस्या पौर्णिमाताई देंगे आणि सरांडी गटाच्या रजनीताई कुंभरे हे विजयी झाले.

महिला व बालकल्याण सभापतीः पौर्णिमाताई देंगे (अपक्ष)

समाजकल्याण सभापती: रजनीताई कुंभरे (भाजप)

कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीः डॉ. लक्ष्मण भगत (भाजप)

आरोग्य व शिक्षण समिती सभापतीः दीपा चंद्रिकापूरे (भाजप)

 राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला महिला व बालकल्याण विषय समितीसाठी नेहा केतन तुरकर, तसेच अन्य दोन समित्यांसाठी किरण पारधी आणि जगदिश बावनथडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, निवडणुकीच्या अंतिम क्षणी त्यांनी माघार घेतली.

काँग्रेसकडून समाजकल्याण समितीसाठी उषा शहारे, महिला व बालकल्याण समितीसाठी विमल कटरे, तसेच इतर दोन समित्यांसाठी जितेंद्र कटरे आणि छाया नागपूरे यांनी अर्ज भरले होते. मात्र, भाजपने बहुमताच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहज पराभूत केले.

भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता. मात्र, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला स्पष्ट संदेश देत चारही समित्यांवर सत्ता प्रस्थापित केली.

यापूर्वी उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत होती, मात्र या निवडणुकीत भाजपने स्वबळावर राष्ट्रवादीला पूर्णपणे दूर ठेवले. आता उपाध्यक्षपदासाठी आरोग्य व शिक्षण समिती कायम ठेवली जाते की कृषी व पशुसंवर्धन समिती दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आमगाव-देवरी मतदारसंघाला संधी नाही : भाजपच्या विजयात अर्जुनी मोरगाव मतदारसंघाला अध्यक्षपदासह दोन विषय समित्यांची पदे मिळाली. मात्र, सडक अर्जुनी आणि आमगाव तालुक्याला कोणतेही सभापतीपद देण्यात आले नाही.

आमगाव-देवरी मतदारसंघातून भाजपचे हनवंत वट्टी आणि किशोर महारवाडे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र, त्यांना संधी न मिळाल्याने असंतोषाची भावना उमटत आहे. यापूर्वीच्या टर्ममध्ये हनवंत वट्टी यांना डावलण्यात आले होते, आणि त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती यंदाही झाली.

स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी अथक मेहनत घेतली असली तरी मोठ्या नेत्यांच्या घरच्या मंडळींना संधी मिळाल्याने, गोरगरीब कार्यकर्त्यांना फक्त आदेश पाळण्याची भूमिका पार पाडावी लागते, असे चित्र उभे राहिले आहे.

भाजपची मजबूत पकड आणि आगामी वाटचाल : या निवडणुकीच्या निकालाने भाजपने गोंदिया जिल्हा परिषदेवर आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. चारही विषय समित्यांवर वर्चस्व मिळवल्यामुळे आगामी काळात भाजपला निर्णय प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येणार आहे.

 

Previous articleज्ञानदीप तेवत राहो : शिक्षणयोगी भाऊ गोस्वामी
Next articleगोंदिया जिल्ह्यातील निर्घृण हत्याकांडाचा उलगडा – पोलिसांची तत्पर कामगिरी