म्हसगाव शेतशिवारात तरुणीचा जाळून खून
अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची उत्कृष्ट कामगिरी
गोंदिया, (दि. 10 फेब्रु) : जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत मौजा म्हसगाव देवुटोला शेतशिवारात एका अनोळखी तरुणीचा जाळून खून करण्यात आला होता. ही घटना उघडकीस येताच पोलीस प्रशासनाने जलद गतीने तपास हाती घेतला आणि केवळ काही तासांत आरोपीला अटक करून प्रकरणाचा उलगडा केला.
सकाळी आढळला जळालेला मृतदेह : सोमवारी (दि. 10 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास म्हसगाव (देवुटोला) शेतशिवारात 20 ते 25 वयोगटातील एका तरुणीचा जळालेला मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. याबाबत म्हसगाव गावच्या पोलीस पाटील सौ. प्रतिमा विजयकुमार मानकर (वय 40) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलीसांनी तातडीने अपराध क्रमांक 49/2025 अंतर्गत कलम 103(1), 238 भा.न्या.सं. 2023 नुसार गुन्हा नोंद केला.
पोलीस प्रशासनाची जलदगती कारवाई – मृतदेहाची ओळख पटली : गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि गोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय भुसारी यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथके तयार केली.
तपासाअंती, घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांच्या चौकशीतून मृत तरुणीची ओळख पटली. मृतकाचे नाव पौर्णिमा विनोद नागवंशी (वय 18, रा. मानेकसा, कालिमाटी, पो. ठाणे आमगाव) असे निष्पन्न झाले. तिच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतल्यानंतर पोलीसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला.
मुलीचा ओळखीचा विटभट्टी मालकच आरोपी : तपासादरम्यान, मृतक पौर्णिमा नागवंशीच्या ओळखीचा आणि पूर्वाश्रमीचा विटभट्टी मालक शकील मुस्तफा सिद्दीकी (वय 38, रा. मामा चौक, गोविंदपुर रोड, गोंदिया) याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःच गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी शकील सिद्दीकी आणि मृतक तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. चौकशीत आरोपीने सांगितले की, पौर्णिमा गरोदर होती आणि ती आरोपीसोबत राहण्याचा हट्ट धरत होती. मात्र, आरोपीला तिच्याशी कोणतेही नाते ठेवायचे नव्हते. त्यामुळे त्याने तिला संपवण्याचा कट रचला.
10 फेब्रुवारीच्या पहाटे त्याने पौर्णिमाला म्हसगाव (देवुटोला) शेतशिवारात नेले. तेथे तिचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहावर चादर व तनस टाकून पेटवले.
आरोपी जेरबंद – तपास सुरू : या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व गोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली मसपोनि मिरा त्र्यंबके करीत आहेत.
या गुन्ह्याच्या उलगड्यात गोंदिया पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
✅ स्थानिक गुन्हे शाखा:पोलीस निरीक्षक दिनेश लबडे,सपोनि. धीरज राजूरकर,मपोउपनि वनिता सायकर
पोलीस अंमलदार: राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, रियाज शेख, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, संतोष केदार, स्मिता तोंडरे, दुर्गेश पाटील, राम खंडारे तपासात मदत करणाऱ्या पथकात खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
✅ गोरेगाव पोलीस ठाणे:पोलीस निरीक्षक अजय भुसारी,सपोनि. ओमप्रकाश गेडाम,पो. उपनि. रोशन येरणे, योगेश रहिले
✅ तांत्रिक सहाय्य:पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर,तांत्रिक सेल पथक
गोंदिया जिल्हा पोलिसांनी जलदगती तपास करून अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.
न्यायासाठी कडक कारवाईची मागणी : या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. गोंदिया पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

