गोरेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या हरणामुळे खळबळ
गोंदिया, दि. ११ फेब्रुवारी: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलांनी वेढलेल्या गोंदिया जिल्ह्यात वन्यजीवांचा मुक्त संचार सुरूच आहे. अशातच गोरेगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर सोमवारी एक भरकटलेलं हरीण धावत सुटल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. काही वेळ शहरातील वाहतूक विस्कळीत झाली, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
भरकटलेलं हरीण शहरात कसं आलं? : नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकदा हे प्राणी जंगलाच्या बाहेर येतात. याच अनुषंगाने, गोरेगाव शहराच्या वेशीवर एक हरीण भरकटत आल्याने ते थेट मुख्य रस्त्यावर आले. अचानक वेगाने धावत सुटल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
अपघात टळले, पण गर्दी झाली : हरीण शहराच्या रस्त्यावरून वेगाने धावत असताना काही वेळेपुरती वाहतूक ठप्प झाली. वाहनचालकांनी सतर्कता बाळगल्याने कोणताही मोठा अपघात टळला. मात्र, या दृश्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे अजूनच गोंधळ निर्माण झाला.
थोड्या वेळाने हरीण पुन्हा जंगलाच्या दिशेने पळाले आणि अखेर ते अभयारण्याच्या हद्दीत दिसेनासे झाले. वन विभागाने अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि वन्यजीवांना त्रास देऊ नये, असे आवाहन केले आहे.

