हरदोलीजवळ भीषण घटना; वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला
आमगाव, (दि. ११ ) : “कधी, कुठे, काय घडेल सांगता येत नाही, पण योग्य वेळी योग्य कृती केल्यास मोठे संकट टळू शकते!” हेच आमगाव – देवरी महामार्गावर घडलेल्या एका थरारक घटनेत सिद्ध झाले. आज दुपारी हरदोली गावाजवळ वाळलेल्या झाडाला अचानक आग लागली आणि ते थेट विद्युत तारांवर कोसळले. या दुर्घटनेत LT लाईनचा सीमेंट खांब तुटला आणि प्रवाहित विद्युत तारा थेट महामार्गावर आल्या, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला.
याच वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या संतोष पुंडकर यांनी अतिशय प्रसंगावधान दाखवत दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवली आणि मोठी जीवितहानी टाळली. त्यांनी तातडीने भ्रमणध्वनीद्वारे लाईनमन कोकाटे, चाकाटे आणि नितिन दाते यांना घटनेची माहिती दिली. विद्युत विभागाने त्वरित वीजपुरवठा खंडित करताच महामार्गावर पडलेल्या तारांना बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत झाली.
संतोष पुंडकर यांच्या या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले आणि मोठे संकट टळले. त्यांच्या सतर्कतेमुळे परिसरात त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. “संतोष पुंडकर म्हणजे या घटनेतील खरे ‘देवदूत’ आहेत,” अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी त्यांचा गौरव केला आहे.

