विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणातूनच यशाचे शिखर गाठणे शक्य – संदीप ब्राम्हणकर
आमगाव : गोंदिया रोड येथील शिशु विहार शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतात, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव इंजी. संदीप ब्राम्हणकर यांनी केले.
स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव इंजी. संदीप ब्राम्हणकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश्वरी ब्राम्हणकर, डॉ. विजय पाऊलझगडे, मुख्याध्यापिका संगीता ब्राम्हणकर आणि देवकी देशमुख उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, वादन, लोकनृत्य, नाटिका तसेच शैक्षणिक व क्रीडात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
STEAM शिक्षण प्रणालीचा पाठपुरावा : संस्थेच्या विशेष शैक्षणिक उपक्रमांवर बोलताना संदीप ब्राम्हणकर म्हणाले की, शिशु विहार शाळेत STEAM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट आणि मॅथेमॅटिक्स) या संकल्पनेच्या आधारावर शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयार राहतील. तिसरीपासूनच मुलांना या सर्व क्षेत्रांचा मूलभूत अभ्यास देण्यात येतो, ज्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळतो.
कार्यक्रमाचे संचालन विनोद गायधणे यांनी केले, तर आभार अश्विनी भांडारकर यांनी मानले.
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

