ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम, तर सामान्य प्रवर्गात द्वितीय क्रमांक
गोंदिया – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित राज्य सेवा Group C परीक्षेत तिरोडा तालुक्यातील समीर उमाशंकर पारधी यांनी अभूतपूर्व यश मिळवत OBC प्रवर्गात राज्यात प्रथम आणि General प्रवर्गात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिरोडा शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
समीर उमाशंकर पारधी यांचे मूळगाव इंदोर खुर्द असून, त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण इंग्रजी माध्यमातून १२ वी पर्यंत पूर्ण केले. लहानपणापासूनच अभ्यासू वृत्ती असलेल्या समीर यांना इंजिनिअर होण्याची इच्छा असल्याने त्यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून पदवी घेतली.
पदवी मिळाल्यानंतर चांगली नोकरी करण्याऐवजी त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला दिल्ली येथे जाऊन अभ्यास केला, मात्र अपयश आल्याने ते पुन्हा गावी परतले आणि तिरोड्यात राहूनच अभ्यास सुरू ठेवला.
अपयशाकडून यशाकडे प्रवास – अथक परिश्रमाची कहाणी : गेल्या तीन-चार वर्षांपासून समीर यांनी MPSC परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा विविध स्तरांवर प्रयत्न केले. प्रारंभी अपयश आले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. सरासरी 8 ते 10 तासांचा सतत अभ्यास, योग्य रणनीती आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन यामुळे अखेर 2023 मध्ये दिलेल्या परिक्षेचे नुकतेच लागलेल्या निकालात त्यांना हे यश मिळाले.
समीर यांच्या मते, त्यांच्या यशाचे तीन महत्त्वाचे मंत्र आहेत:
1. निरंतर अभ्यास
2. कठोर परिश्रम
3. स्मार्ट वर्क आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर
कुटुंबाचा आधार आणि प्रेरणादायी प्रवास : समीर पारधी यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन, भाऊ आणि मित्रपरिवाराला दिले आहे. त्यांचे वडील उमाशंकर पारधी हे प्राथमिक शिक्षक असून, आई अंजली पारधी या देखील शिक्षिका आहेत. मोठा भाऊ अमर पारधी हा आर्किटेक्ट आहे. शिक्षण आणि मेहनतीचे संस्कार घरातूनच मिळाल्याने त्यांना अभ्यासात सातत्य ठेवता आले.
पुढील लक्ष्य – राजपत्रित अधिकारी बनण्याचा संकल्प : समीर पारधी यांनी आता MPSC राज्यसेवा परीक्षा पास करून राजपत्रित अधिकारी होण्याचा निर्धार केला आहे. ते म्हणतात, “योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास कोणतीही मोठी परीक्षा घरी राहूनही उत्तीर्ण होऊ शकते.”
त्यांच्या ऐतिहासिक यशाबद्दल स्नेही स्वजन, मित्र मंडल व अखिल भारतीय महासंघचे पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.विशाल बिसेन, राष्ट्रीय महासचिव खुशाल कटरे,महासंघ महाराष्ट्र राज्य महिला कार्यकारीणी अध्यक्ष एड.माधुरीताई रहांगडाले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वाय.टी.कटरे, महासंघ तिरोडा तालुकाध्यक्ष ललितकुमार रहांगडाले, तिरोडा तालुका सचिव संजय कटरे,महिला कार्यकारीणी जिल्हा उपाध्यक्ष सौ.हेमलता रहांगडाले,जिल्हा उपाध्यक्ष सौ.सिमा सुनिल बिसेन, यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून प्रशासकीय वाटचालीसाठी स्नेही स्वजन तर्फे शुभेच्छा दिल्या.

