फार्मर आयडीशिवाय शासकीय योजनांचा लाभ नाही महेंद्र दिहारे
आमगांव, 13 फेब्रुवारी : केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे यांनी केले आहे.
तालुक्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून येथे मोठ्या प्रमाणात जिरायती व बाग़ायती शेती आणि इतर नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातील अंदाजे 53,700 शेतकऱ्यापैकी 10,103 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.उरलेल्या शेतकऱ्यानी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तातडीने फार्मर आयडी काढावा, अन्यथा योजनांचा लाभ मिळणार नाही.
फार्मर आयडी कसा मिळेल ? : शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी तयार करावा. यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत –
✔ आधार कार्ड (मोबाईल क्रमांक आधार व बँक खात्याशी लिंक असावा)
✔ सात-बारा उतारा
✔ नमुना आठ अ
फार्मर आयडीचे फायदे : योजनांचा लाभ थेट खात्यात..! फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान निधी, पीक अनुदान योजना, शेतकरी सन्मान योजना यांसारख्या योजनांचा लाभ मिळेल. तसेच, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा, सुलभ विपणन सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
सात-बारा आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक : तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे यांनी स्पष्ट केले की, सात-बारा उतारा आधार कार्डशी लिंक केल्याशिवाय फार्मर आयडी तयार होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला सात-बारा आधारशी लिंक करावा.”फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून घ्यावा,” असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांनो, वेळ वाया घालवू नका.! तातडीने तुमचा फार्मर आयडी बनवा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या.!

