आमगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा ऑक्सिजनवर..!

0
530

वर्षाला ८०,००० हून अधिक रुग्णांचा उपचार, तरीही मूलभूत सुविधा अपुऱ्या

 उपजिल्हा रुग्णालयाची मागणी जोरात; भारतीय जनकल्याण फाउंडेशनचा पुढाकार

आमगाव : महाराष्ट्राच्या सीमेवरील आमगाव ग्रामीण रुग्णालयात दरवर्षी ८०,००० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असले तरी आवश्यक वैद्यकीय साधने आणि कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा अक्षरशः ऑक्सिजनवर आहे. येथील वाढती लोकसंख्या आणि रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेता या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या युवा कार्यकर्त्यांनी केली आहे.

आरोग्य सुविधांचा अभाव; रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार : गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुका ठिकाण असलेल्या आमगाव येथे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, येथे अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, जसे की –

☑️सिटी स्कॅन आणि एक्स-रे यंत्रणेचा अभाव
☑️अतिदक्षता विभाग (ICU) नाही
☑️लॅब तपासणी यंत्रणा उपलब्ध नाही
☑️आरोग्य सेवक आणि विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता
☑️शवविच्छेदन गृहाची अत्यंत दयनीय अवस्था
       या सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे जावे लागते आणि आर्थिक बोजा सहन करावा लागतो.

भारतीय जनकल्याण फाउंडेशनचा पुढाकार; शासन दरबारी मागणी : गेल्या अनेक वर्षांपासून आमगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा करत आहेत. आता भारतीय जनकल्याण फाउंडेशनने शासनाकडे लेखी निवेदन सादर केले असून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. इंजि. सुभाष आकरे तसेच कार्यकर्ते यशवंत मानकर, उत्तम नंदेश्वर, विक्की मानकर, योगेश मानकर, आकाश रामटेके, नितेश गणवीर, प्रमोद बोहरे, नरेंद्र निखारे, देवाशिष मेंढे, भुवन सलामे, गणेश महारवाडे, प्रा. दिनेश रहांगडाले आदींनी रुग्णालयाच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमगाव हे तालुका ठिकाण असूनही येथे उपजिल्हा रुग्णालयाची सुविधा नाही, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने नागरिकांत मोठा संताप आहे. अनेक वेळा शासनाकडे मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे – नागरिकांची मागणी : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी आमगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा आणि आधुनिक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
भारतीय जनकल्याण फाउंडेशनने शासनाला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमगाव तालुका आणि सीमावर्ती भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.

Previous articleनियमांचे काटेकोरपणे पालन करा- राजेंद्र केसरकर
Next articleगोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेससाठी धक्क्यांवर धक्के, लवकरच कोरोटे शिंदे गटात…