आमगांवच्या राजकारणात मोठी घडामोड : नाराज कांग्रेस नेते शिवसेनेत जाणार
आमगाव – गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहषराम कोरोटे हे लवकरच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांचे तिकीट कापल्याने ते नाराज होते. आता ते शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवरी येथे पक्षप्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
काँग्रेसच्या निर्णयाने कोरोटे नाराज : गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या सहषराम कोरोटे यांनी २०१९ मध्ये आमगाव-देवरी मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, २०२४ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तिकीट दिले. परिणामी, पक्षाला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. यामुळे कोरोटे व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
शिंदे गटात मोठा इनकमिंग : काही दिवसांपूर्वीच अर्जुनी मोरगावचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या पुत्रासह शिंदे गटात प्रवेश केला. आता कोरोटे यांच्या पाठोपाठ गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार देखील आपल्या पुत्रासह शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
नाना पटोले यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर पूर्व विदर्भात पक्षासाठी नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसमधून होत असलेल्या या सततच्या इनकमिंगमुळे पक्षाची गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील स्थिती डळमळीत झाली आहे. आगामी राजकीय समीकरणांवर या घडामोडींचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

