विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी एकजूट – सौंदड येथे महत्त्वपूर्ण सभा संपन्न

0
208

सहकारी संस्थांचे भाग भांडवल कर्जात समाविष्ट करण्याच्या निर्णयाला विरोध सहकार न्यायालयात जाण्याची तयारी

सौंदड (ता. सडक अर्जुनी) – विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे भाग भांडवल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्जात जमा करण्याच्या आदेशाविरुद्ध लढा देण्याचा निर्धार गोंदिया तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटनेच्या सभेत करण्यात आला. सौंदड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा उभारण्यावर भर दिला.

सभेतील महत्वाचे ठराव आणि भूमिका :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या भाग भांडवलाच्या रकमेचा विनाकारण कर्ज वसुलीमध्ये समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात प्रथम बँकेशी चर्चा करून संपूर्ण कागदपत्रे सादर करण्यात येणार आहेत. जर बँकेने यावर तोडगा काढला नाही, तर सहकार न्यायालयात विवाद दाखल करण्याचा ठराव सभेत पारित करण्यात आला.

सभेला प्रमुख मार्गदर्शन : या महत्वपूर्ण सभेला जिल्हाध्यक्ष डोमाजी बोपचे, सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुभाष आकरे, तसेच आमगांव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बोरकन्हारचे अध्यक्ष खुमेश कटरे, गोंदिया तालुका संघटनेचे अध्यक्ष लखन मेंढे यांनी मार्गदर्शन केले.
         तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष प्रभूदयाल अग्रवाल (सौंदड), मनोहर काशिवार (धानोरी), उद्धव परशुराम कर (खोडशिवनी), विश्वनाथ राहंगडाले (गोंगले), केशव तरोने (वडेगाव), मधुकर गावरान (डव्वा), गणेश राऊत (जांभळी), रमेश ब्राह्मणकर (दुंडा), धरेंद्र चव्हाण (परसोडी) यांच्यासह अनेक गटसचिव व पदाधिकारी उपस्थित होते.
          जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये नाराजी आहे. हा आदेश अन्यायकारी असल्याने याविरोधात एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार सर्व सभासदांनी केला आहे. पुढील टप्प्यात बँकेशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

Previous articleगोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेससाठी धक्क्यांवर धक्के, लवकरच कोरोटे शिंदे गटात…
Next articleसौ. वर्षा पटेल के जन्मदिन पर स्वास्थ्य जागरुकता एवं योग शिविर का आयोजन