सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान
तिरोडा / पोमेश राहांगडाले
तिरोडा येथील अदिती संजयसिंह बैस हिने महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूरच्या २०१९-२५ बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरव प्राप्त केला आहे. तिने ८.७२ सीजीपीए मिळवत प्रतिष्ठित ‘श्री हिरालाल चुडामण पटेल सुवर्णपदक’ पटकावले. या सुवर्णपदकासह अदितीने एकूण सात सुवर्णपदके जिंकत राष्ट्रीय स्तरावर एक वेगळाच मानदंड प्रस्थापित केला आहे.
ही प्रतिष्ठेची सुवर्णपदके तिला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या समारंभात भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदरकुमार, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सात सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण असते. मात्र, अदितीने कठोर परिश्रम, सातत्य आणि अचूक ध्येयधोरण याच्या जोरावर हा उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केला आहे. या सात सुवर्णपदकांसह तिने राष्ट्रीय स्तरावर नाव कोरले आहे.
भविष्यात न्यायाधीश बनण्याची इच्छा : आपल्या पुढील प्रवासाबद्दल बोलताना अदितीने “माझे ध्येय न्यायाधीश बनण्याचे आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन” असे सांगितले.
तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिरोडा शहरासह संपूर्ण राज्यभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. शहरातील विविध स्तरांतून तिच्या यशाचे अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

