आमदार विजय राहांगडाले यांच्या प्रयत्नाना यश : २०० कोटींचा विशेष निधी मंजूर; शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न
तिरोडा : पोमेश राहांगडाले
धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत तिरोडा व गोंदिया तालुक्यातील ३०५५.५९ हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामात धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
नहर दुरुस्तीच्या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून आमदारांनी त्वरित काम सुरू करण्यास गती दिली आहे. सिंचन व्यवस्थेतील अडचणी दूर करून पाण्याचा समान लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी नहर दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.
दर महिन्याला आढावा बैठक; शेतकऱ्यांना होणार फायदा : या महत्त्वाच्या कामांची पूर्तता वेळेत होण्यासाठी आमदार विजय रहांगडाले नियमितपणे संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत. तसेच, उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या इतर नहरांच्या दुरुस्तीचे नियोजन करून त्यांना मंजुरी मिळण्यासाठी शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीला वेग : नहर दुरुस्तीमुळे सिंचन क्षेत्र वाढण्याची मोठी संधी असून, पाण्याचा तुटवडा भासणाऱ्या शेतीस मदतीचा हात मिळणार आहे. या निर्णयामुळे विधानसभा क्षेत्रातील शेतकरी सशक्त होऊन अधिक उत्पादनक्षम बनतील, अशी अपेक्षा आहे.
नहर दुरुस्ती प्रकल्पाच्या आढावा बैठकीस कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, उपअभियंता पंकज गेडाम, प्रणय नागदिवे आणि मुख्याधिकारी राहुल परिहार उपस्थित होते. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांना गती देण्याच्या सूचना आमदार विजय रहांगडाले यांनी दिल्या आहेत.

