माजी आमदार सहसराम कोरोटे 21 फेब्रुवारीला शिवसेना (शिंदे गट) मध्ये होणार सामील

0
501

काँग्रेसच्या नाराजीमुळे मोठा निर्णय, 10 हजार कार्यकर्त्यांसह शिवसेना(शिंदे गट) मध्ये प्रवेश

गोंदिया, 18 फेब्रुवारी: आमगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी काँग्रेस पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. ही माहिती शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या उपस्थितीत मुकेश शिवहरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सहसराम कोरोटे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना अंधारात ठेवले आणि अशा व्यक्तीला तिकीट दिले, जो पक्षाचा प्राथमिक सदस्य देखील नव्हता. यामुळेच काँग्रेसला आमगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

21 फेब्रुवारीला 10 हजार कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्ष प्रवेश

कोरोटे यांनी सांगितले की, 21 फेब्रुवारी 2025 रोजी देवरी येथील क्रीडा संकुलात आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात ते 10 हजार समर्थकांसह  शिवसेना(शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी दावा केला की, काँग्रेस आता आमगाव मतदारसंघात अस्तित्व गमावेल आणि आगामी निवडणुकांमध्ये सेना मोठा विजय मिळवेल.

यावेळी शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी सांगितले की, लवकरच आणखी एक माजी आमदार आणि एक माजी खासदार पक्षात प्रवेश करणार आहेत. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार सहसराम कोरोटे आणि सुगत चंद्रिकापुरे उपस्थित होते.