सीसीटीव्हीमुळे पोलिसांची जलद कारवाई…! चोरी कबूल; दोघे सराईत गुन्हेगार अटकेत…! बोथली गावातील दुसऱ्या चोरीचाही खुलासा…!
आमगाव : आमगांव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अचूक तपास आणि धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांत चोरी गेलेले ₹८०,००० रोख जप्त केले. यात दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी आमगाव आठवडी बाजारात एका वृद्ध इसमाच्या थैल्यातून ₹५०,००० चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्यात आली आणि त्यांचा मागोवा घेण्यात आला.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक टाउन बीट परिसरात गस्त घालत असताना लाल-काळ्या रंगाची पल्सर (बिना नंबर प्लेटची) मोटरसायकल घेवून दोन संशयित इसम फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून बँक ऑफ इंडिया, आमगाव जवळ त्यांना पकडले.
संशयितांपैकी एकजण बँकेतील लोकांवर नजर ठेवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने आपले नाव योगेश राजकुमार मुरादवानी (वय ४०, रा. श्रीनगर, गोंदिया) असे सांगितले. त्याला बँकेत येण्याचे कारण विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. बाहेर मोटारसायकलजवळ थांबलेल्या इसमाचे नाव विचारले असता, त्याने विलास घनशाम मानकर (वय २३, रा. गौतम नगर, गोंदिया) असे सांगितले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये १४ फेब्रुवारी २०२५ रोजी वृद्ध इसमाचा पाठलाग करून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांसमोर दोघांनी ₹५०,००० चोरीची कबुली दिली.
दुसऱ्या गुन्ह्याची कबुली; आणखी ₹३०,००० चोरी उघड: सखोल चौकशीत १६ जानेवारी २०२५ रोजी बोथली गावाजवळील नाल्याजवळ एका प्रवाशाच्या हातातील थैल्यातून ₹३०,००० रोख चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली.
या दोन्ही घटनांप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात अप. क्र. १०७/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या. संहिता व अप. क्र. २८/२०२५ कलम ३०४ भा. न्या. संहिता प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यांचा पुढील तपास पोहवा असिम मन्यार (आमगाव पोलीस स्टेशन) करत आहेत.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा (कॅम्प देवरी), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील (आमगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, सपोनि निलेश डाबेराव, पोहवा असिम मन्यार, पोहवा दुधराम मेश्राम, पोहवा दसरे, पोहवा खुशालचंद बर्वे, पोशि विनोद उपराडे, चेतन शेंडे, विक्रांत सलामे, पोशि भागवत कोडापे, नितीन चोपकर, चापोशि अक्षय कावरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.
बँकेतील व्यवहार करताना किंवा मोठ्या रोख रकमेची ने-आण करताना नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आमगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.

