विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम : ‘शिकता शिकता कमवा’ योजनेतून पालकांना पहिली भेट

0
154

स्वावलंबन आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा आगळा उपक्रम

आमगाव : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (मारवी), पुणे आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्यचे पहीले सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘शिकता शिकता कमवा’ या योजनेचा विशेष उपक्रम तहसील कार्यालय, आमगाव येथे दि.१९ फेब्रूवारी रोजी पार पडला. शिवाजी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.

या योजनेत सहभागी विद्यार्थ्यांनी संगणक प्रशिक्षणादरम्यान स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या पैशातून त्यांच्या पालकांसाठी भेटवस्तू खरेदी केल्या. हा क्षण भावनिक ठरला, पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसत होते.

या कार्यक्रमाला नायब तहसीलदार एस. जी. वेलादी, महसूल सहाय्यक वाय. एस. भोयर, एच. जे. जांभुळकर, नाझर एम. एम. वेव तसेच आदित्य कॉम्प्युटर, गणेशा कॉम्प्युटर्स, युनिक कॉम्प्युटर आणि सदिय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, आमगाव या संस्थांचे संचालक उपस्थित होते.

शिवाजी जयंती निमित्त सर सेनापती वीर बाजी पासलकर यांची प्रेरणा : छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सेनापती वीर बाजी पासलकर यांच्या त्याग व शौर्याच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवला गेला. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी समर्पित योद्धे घडवले, तसेच आजच्या युगात आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक घडवण्याची गरज आहे. याच उद्देशाने हा कौशल्य विकास उपक्रम साकारला गेला.

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राबवलेल्या या योजनेतून विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासोबतच आर्थिक स्वावलंबन व जबाबदारीची जाणीव झाली. या अनोख्या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि समाजातील नागरिकांनी विशेष कौतुक केले. ‘शिकता शिकता कमवा’ ही योजना विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच स्वतःच्या कष्टातून मिळणाऱ्या कमाईचा उपयोग करण्याची जाणीव करून देणारी आहे. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.