गोंदिया : नियतीची परीक्षा कधी, कुणी, कशी देईल सांगता येत नाही. गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार येथील आदेश कटरे याच्या आयुष्याला मोठा आघात बसला, जेव्हा त्याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले आणि त्याच दिवशी त्याला दहावीच्या परीक्षेला हजर राहायचे होते. घरात वडिलांचा मृतदेह असताना आदेशने शिक्षणावरील निष्ठा दाखवत परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला. मन कठीण करून त्याने मोहाडी परीक्षा केंद्रावर जाऊन मराठीचा पेपर सोडवला आणि नंतर वडिलांचे अंतिम संस्कार केले.
वडिलांचे निधन आणि पहिला पेपर :
मुंडीपार येथील ठानेश्वर कटरे यांचे शुक्रवारी पहाटे अचानक निधन झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा आदेश कटरे यंदा दहावीच्या परीक्षेला बसला आहे. नियतीच्या या कठीण प्रसंगात आदेशला पेपर द्यायचा की वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी व्हायचे, याचा विचार करणेही अवघड होते. मात्र, पूर्ण वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्याने मन घट्ट करून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी सोडवला मराठीचा पेपर :
सकाळी ११ वाजता मोहाडी परीक्षा केंद्रावर आदेशने मराठीचा पेपर सोडवला. मनात दुःखाचा डोंगर असतानाही केवळ एका तासात परीक्षा पूर्ण करून तो तातडीने घरी परतला. त्यानंतर आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले. अशा कठीण प्रसंगातही आदेशने शिक्षणाविषयी असलेली निष्ठा दाखवत जिद्द आणि आत्मबळाचे दर्शन घडवले.
अठरा विश्व दारिद्र्यातून शिक्षणाची लढाई:
आदेश ठानेश्वर कटरे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे. वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्याच्या कुटुंबावर आणखी संकट ओढवले आहे. मात्र, संकटांचा सामना करत त्याने शिक्षणात सातत्य ठेवण्याचा निर्धार केला आहे.
आदेशच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परीक्षेला जाण्यासाठी शिक्षक रमेश बिसेन आणि क्षत्रिय पोवार समाज संघटनेचे सचिव मोरेश्वर चौधरी यांनी त्याला प्रोत्साहन दिले. तसेच, मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चौरागडे, माजी सरपंच धुर्वराज पटले आणि गावकऱ्यांनी त्याला धीर दिला.
या कठीण प्रसंगात आदेशने घेतलेला निर्णय आणि दाखवलेली जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. संकटांवर मात करत शिक्षण पूर्ण करण्याचा त्याचा निर्धार निश्चितच कौतुकास्पद आहे.

