आयुषी सिंह व प्रकाश भांदककर यांना “बालस्नेही” पुरस्कार जाहीर.

0
137

प्रतिनिधी -अमोल कोलपाकवार..

गडचिरोली, दि. 24 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित “बालस्नेही” पुरस्कार-2024 जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांना जाहीर झाला आहे. बालहक्क संरक्षण आणि बालकल्याण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

श्रीमती आयुषी सिंह आणि प्रकाश भांदककर यांनी गडचिरोली जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध प्रभावी उपक्रम राबवले आहेत. त्यांनी विशेषतः तालुकास्तरीय बालसंगोपन योजना शिबिरे आयोजित करून बालहक्क संरक्षणाला चालना दिली. तसेच, प्रत्येक तहसील कार्यालय आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय परिसरात महिलांसाठी हिरकणी कक्षांची स्थापना केली. याशिवाय, महिला व बालकांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशी बेन शहा यांनी दि. 21 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार वितरण समारंभ 3 मार्च 2024 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, गृह (शहरी) राज्यमंत्री योगेश कदम आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर या मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

000