शिवजयंती सोहळ्यात रक्तदान, आरोग्य तपासणी आणि सफाई कामगारांचा गौरव

0
40

सडक अर्जुनी: येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शिवजयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. विविध समाजोपयोगी उपक्रमांसह रक्तदान, मोफत दंत तपासणी, शुगर तपासणी, सफाई कामगारांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि प्रबोधनपर कीर्तन यांचा समावेश होता. शिवजयंती सोहळ्याला स्थानिक नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण आणि पूजन करून झाली. यावेळी न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, ठाणेदार मंगेश काळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणित पाटील, नगराध्यक्ष तेजराम मडावी, सभापती वंदना डोंगरवार, नगरसेवक शशिकला टेंभुर्णे, अश्लेश अंबादे, गोपी खेडकर, रजनी परिहार, मुख्याध्यापिका कु. एन. के. गजभिये, रुपाली बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत कापसे, उपाध्यक्ष नितेश कोरे, सचिव उमेश उदापुरे, सहसचिव विक्रम पुरी, कोषाध्यक्ष रोशन गहाणे आणि समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये ३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहिली. या शिबिरासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालय रक्तपेढीच्या टीमने सहकार्य केले.

आरोग्य सेवेच्या उद्देशाने डॉ. राहिले यांच्या मार्गदर्शनाखाली २५ नागरिकांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. तसेच ट्विंकल पॅथॉलॉजीचे भेषक यावलकर यांच्या मदतीने ५२ नागरिकांची शुगर तपासणी करण्यात आली.

शिवजयंतीच्या निमित्ताने २५ पुरुष सफाई कामगारांना टी-शर्ट, ७ महिला सफाई कामगारांना साडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार आर. व्ही. मेश्राम आणि सेवानिवृत्त शिक्षक वाय. टी. वंजारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल, एस. चंद्रा नर्सिंग स्कूल, एस. चंद्रा पब्लिक स्कूल आणि जी. ई. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात सामूहिक नृत्य, गीतगायन, भाषण, पोवाडा आणि जोगवा आदींचा समावेश होता.

शिवजयंतीच्या निमित्ताने महाप्रसाद वितरण करण्यात आले. ह.भ.प. समीर कोरे यांनी जाहीर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर संदेश दिला.

शिवजयंती सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणित पाटील यांनी उपस्थित नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके वाटप केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नेमिचंद गिऱ्हेपुंजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रितेश खरोले यांनी मानले. गणेश मालदे, गौरव मेघराज, मोनू राजगिरे, शुभम राजगिरे, दिशांत खरोले, कालू अली सय्यद, दिग्रेस टेंभुर्णे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले.