अनिष्ट तफावतीविरोधात लढ्याचा निर्धार, सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणावर भर
देवरी: सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटना, गोंदिया तालुका देवरीची सभा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, देवरी येथे दि.२५ फेब्रूवारी रोजी संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डोमाजी बोपचे होते. जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष सुभाष आकरे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सभेत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे भाग भांडवल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्जात जमा करण्याच्या आदेशाविरोधात लढा देण्यावर सखोल चर्चा झाली. उपस्थित सदस्यांनी या निर्णयामुळे सहकारी संस्थांच्या आर्थिक स्वायत्ततेवर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे या आदेशाविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी पुढील उपाययोजनांवर चर्चा झाली. संस्था सक्षम राहिल्या तरच शेतकरी व लघुउद्योजकांना फायदा होईल, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. सहकार क्षेत्र हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या सुदृढीसाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.
सभेतील प्रमुख डोमाजी बोपचे – अध्यक्ष, जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटना, गोंदिया,प्यारेलाल गौतम – उपाध्यक्ष, गोंदिया जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संघ,सुभाष आकरे – सहकार महर्षी तथा अध्यक्ष, जिल्हा सहकारी बोर्ड,भालिकचंद आचले – अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पुराडा,वसंत पुराम – अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बोरगाव,यशवंत मानकर – महामंत्री, जनकल्याण फाउंडेशन,शंकर भाऊ मडावी
,शालिक फुंडे – अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बनगाव,मधुकर शहारे,आर. जे. महारवाडे,जीवन सलामे,परमानंद जनबंधू,एम. एन. सय्यद,सुदर्शन ठाकूर,टी. आर. कोरेटी – गटसचिव आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
संस्थांच्या सक्षमीकरणासाठी पुढील दिशा:सभेच्या शेवटी सहकारी संस्थांच्या भविष्याचा विचार करून काही ठोस निर्णय घेण्यात आले. संस्थांचे भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, सहकार संस्थांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी कायदेशीर लढा देणे, तसेच संघटनात्मक बळकटीसाठी सर्व संस्था एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला.
सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा सर्व संस्थांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असून, सहकार संस्थांचा पाया मजबूत करणे हेच अंतिम ध्येय असल्याचे जिल्हाध्यक्ष डोमाजी बोपचे यांनी स्पष्ट केले.

