मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

0
90

आमगाव: भवभूती शिक्षण संस्था, आमगाव द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून एन. जे. कतलेवार (प्राचार्य, ल. मा. कॉलेज ऑफ एज्युकेशन – डी.एड.) आणि प्रा. देवेंद्र बोरकर उपस्थित होते.

कार्यक्रमात डी. फार्म आणि बी. फार्मच्या विद्यार्थ्यांनी मराठी कविता, चारोळी, मराठी गौरव गाथा तसेच एकांकिका सादर केली.

प्रमुख पाहुणे एन. जे. कतलेवार यांनी भाषेच्या संवर्धनाबाबत विचार मांडताना सांगितले की, “भाषेची गंगा घातल्या पाण्याने वाहत नाही, ती संस्कारक्षम वयात, शाळा-महाविद्यालयीन स्तरावर आणि लोकसंस्कृतीच्या विविध रूपांमध्ये जपली पाहिजे. सध्या भाषेच्या आरशाचा पारा निखळतो आहे, याकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवे.”

प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आईच्या तोंडून पहिली ओवी बाळाने ऐकली, तेव्हापासूनच मराठी भाषेचा जन्म झाला असेल. कवी कुसुमाग्रज यांची कविकल्पना, मातृभाषेवरील प्रेम आणि मराठीच्या अभिजात दर्जामुळेच मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली आहे. मात्र, परभाषीय अतिक्रमण याचा लाभ आणि धोका दोन्हीही समजून घेणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती हत्तीमारे आणि कुणीका हत्तीमारे यांनी केले, तर प्रा. जितेंद्र शिवणकर यांनी विशेष आभार मानले. संस्थेचे सचिव केशव भाऊ मानकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Previous articleमराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
Next articleआमगांव तहसील में गूंजा ‘हर हर महादेव’ का जयघोष