आमगांव : श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या प्रांगणात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात वैज्ञानिक डॉ. सी. वी. रमन आणि स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून झाली.
या विशेष प्रसंगी विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, नागपूर येथील कार्यकारी सदस्य मनीषा घरे आणि प्रद्युम्न शोचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या संचालिका डॉ. भाग्यश्री वाळके आणि मुख्याध्यापिका श्रीमती स्मृती छपरीया यांचीही उपस्थिती लाभली.
या दिवसाचे औचित्य साधून शाळेत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत प्री-प्रायमरीपासून आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विज्ञानप्रयोगांची मॉडेल्स आणि चार्ट्स तयार करून त्याबाबत सविस्तर माहिती उपस्थित पाहुण्यांना व पालकांना दिली.
कार्यक्रमात विविध सादरीकरणेही झाली. सातवीच्या विद्यार्थ्यांनी “सकस आहार” या विषयावर नाटिका सादर केली, तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी लघु विज्ञान प्रयोग करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. याशिवाय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत “विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे” हे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका स्मृती छपरीया मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून समारोप केला.

