मराठी वाङ्मय गौरव दिन भवभूति महाविद्यालयात उत्साहात साजरा

0
277

मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्नांची गरज – इतिहासकार ओ. सी. पटले

आमगाव : भवभूति महाविद्यालय, आमगाव येथे मराठी वाङ्मय गौरव दिन (२७ फेब्रु.) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद राहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास इतिहासकार ओ. सी. पटले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापकवृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक इतिहासकार ओ. सी. पटले यांनी मराठी भाषेच्या उत्पत्तीपासून ते तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेपर्यंत सविस्तर माहिती दिली. त्यांनी ‘विवेकसिंधु,’ ‘गाथा सप्तशती’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथांचा उल्लेख करून मराठी साहित्याचा ऐतिहासिक वारसा उलगडला. तसेच कुसुमाग्रज यांच्या योगदानावर प्रकाश टाकत मराठी भाषेच्या ज्ञानपरंपरेचे महत्त्व स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे जगभरातील स्थानिक भाषांवर अस्तित्वाचे संकट कोसळले आहे. भारतात २०११ च्या जनगणनेनुसार ६५०० हून अधिक भाषा अस्तित्वात आहेत, मात्र प्रत्येक दोन आठवड्याला एक भाषा नामशेष होत आहे. अशा परिस्थितीत माय मराठीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असून, प्रत्येक मराठी भाषिकाने आणि साहित्यिकाने या दिशेने योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या निर्णयाचे स्वागत केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. राहांगडाले यांनी कवी कुसुमाग्रज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अन्य श्रेष्ठ मराठी साहित्यिकांच्या उल्लेखनीय साहित्यकृतींचे दाखले देऊन मराठी भाषेच्या समृद्धतेचे दर्शन घडवले. त्यांच्या प्रभावी भाषणाने संपूर्ण श्रोते मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. के. एस. पात्रिकर यांनी केले.