टेंभुरणी फळाच्या अभ्यासावर निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा विशेष उपक्रम

0
157

भामरागड : निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने टेंभुरणी फळाच्या अभ्यासावर विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक डॉ. कैलास व्हि. निखाडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.   

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) होते, तर उद्घाटन प्रा. डॉ. संतोष डाखरे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विनायक मोराळे व प्रा. विशाल तावेडे उपस्थित होते.

टेंभुरणी वृक्षाचे औषधी व आर्थिक महत्त्व:

कार्यक्रमात डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी टेंभुरणी वृक्षाच्या शारीरिक रचनेबद्दल माहिती दिली. हा वृक्ष साधारण २०-२५ मीटर उंच वाढतो आणि त्याचे खोड सरळ, तर व्यास ६०-८० सेमी असतो. या वृक्षाला संस्कृतमध्ये “तिन्दुक”, तर हिंदीत “तेंदू” म्हणतात.

तेंदू वृक्षाची पाने तंबाखू भरून विड्या वळण्यासाठी वापरली जातात. उन्हाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ते संकलित करून सुकवले जातात आणि त्याचा उपयोग विड्या तसेच सिगार बनवण्यासाठी केला जातो. मात्र, तेंदूपत्त्यांच्या संकलनासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण वाढल्याने टेंभूर्णीच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे.

संवर्धन आणि रोजगाराच्या संधी:

कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी सांगितले की, टेंभुरणी वृक्षाच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण त्याचे औषधी आणि आर्थिक महत्त्व खूप मोठे आहे.

प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी या वनस्पतीच्या लागवडीवर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, जर टेंभुरणी फळाची योग्य प्रकारे बाजारपेठ निर्माण केली गेली, तर स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

प्रमुख पाहुण्यांनीही टेंभुरणी फळाचे औषधी उपयोग आणि त्याच्या व्यापाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन कु. पुष्पा होयामि यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज वाचामी यांनी मानले. श्री. बंडू बोंडे आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

या कार्यक्रमामुळे टेंभुरणी वृक्षाविषयी जनजागृती होऊन त्याच्या संवर्धनाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Previous articleजि.प. शाळा मोहगाव येथे विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांची सर्जनशीलता उजळली
Next articleभुताईटोला (गोरेगाव) येथे विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा संपन्न