शिक्षकांची विक्रमी उपस्थिती लक्षवेधी;
“शिक्षकांना समस्यामुक्त करून जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण तयार करणार” -जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर
गोंदिया:प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार व नवनिर्वाचित जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आणि भव्य शिक्षक मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील हजारो शिक्षक-शिक्षिकांची विक्रमी उपस्थिती लाभली.
गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांना आश्वस्त करताना सांगितले की, “जिल्हा परिषद शिक्षकांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही, त्यांनी आनंदी मनाने अध्यापन करून जिल्ह्याचे नाव अग्रस्थानी ठेवावे. त्यासाठी जिल्हा परिषद त्यांना सर्वतोपरी सहकार्य करील.”
उपरोक्त कार्यक्रमात लायकराम भेंडारकर (जिल्हा परिषद अध्यक्ष),राजकुमार बडोले (माजी मंत्री व आमदार),विनोद अग्रवाल (आमदार),विजय रहांगडाले (आमदार),संजय पुराम (आमदार),सुरेश हर्षे (जिल्हा परिषद उपाध्यक्ष),पंकज रहांगडाले (जि. प. माजी अध्यक्ष),रजनी कुंभरे (सभापती),दीपाताई चंद्रिकापूरे (सभापती) आणि मुनेश रहांगडाले (सभापती) या मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद शाळा व शिक्षकांविषयी अभिमान व्यक्त केला. “शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष काठोळे होते.
“शिक्षक आधुनिक राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शासनाने जिल्हा परिषद शाळांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचे ओझे कमी होणे गरजेचे आहे,” असे मत थोरात यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून संघटनेचे राष्ट्रीय संघटक नूतन बांगरे, राज्य उपाध्यक्ष उमाशंकर पारधी, राज्य उपाध्यक्ष आयुब खान, विभागीय अध्यक्ष केदार गोटेफोडे, राज्य सदस्य अनिरुद्ध मेश्राम हे उपस्थित होते.
महिला शिक्षिकांसाठी हळदी-कुंकू समारंभ : या कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणांपैकी एक म्हणजे महिला शिक्षिकांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभ. याचे संचालन यशोधरा सोनवणे, यशवंती लिखार आणि नीतू डहाट यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक संघ महिला आघाडी गोंदिया आणि तालुका महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
संघटनेच्या मागण्या व शिक्षकांच्या समस्या : कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांकडे उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले.
“संच मान्यतेच्या शासन निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळा धोक्यात येत असून, हा निर्णय तात्काळ रद्द करावा,”
“शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करून मानधन ४०,००० रुपये करण्यात यावे.”
“शिक्षण सेवकांची अट न ठेवता स्व-जिल्ह्यात बदली करण्याचा निर्णय घ्यावा.”
यावर उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष हेमंत पटले आणि तालुकाध्यक्ष कैलास हांडगे यांनी केले, तर जिल्हा सचिव अरविंद उके यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकारी तसेच शिक्षक संघटना प्रेमी शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले.
या भव्य मेळाव्याच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या आणि त्यांच्या समाधानासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच भक्कमपणे उभा आहे, हे या सोहळ्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

