आमगाव : भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचलित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे आज प्रो. महादेवलाल श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय औषधी निर्माण शिक्षण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रो. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी औषधी निर्माण शास्त्राचे महत्त्व, त्यामधील नव्या संशोधनांची दिशा आणि प्रो. श्रॉफ यांच्या योगदानावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रो. श्रॉफ यांनी १९३६ साली बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये फार्मसी अभ्यासक्रमाची सुरुवात करून औषधी निर्माण शास्त्राला स्वतंत्र ओळख मिळवून दिली. त्यांच्यामुळे पूर्वी कंपाउंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्राला शास्त्रीय आधार मिळून उज्ज्वल भविष्य घडले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. महेंद्र तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रोशनी अग्रवाल यांनी व्यक्त केले. या वेळी डी. फार्म व बी. फार्मचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते.

