जागतिक महिला दिन विशेष
देवरी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या संघर्षमय जीवनाचा मागोवा घेतला तर तिच्या कष्टांचे अनमोल योगदान स्पष्ट होते. इतिहास साक्षी आहे की, आजही अनेक ठिकाणी स्त्रिया गुलामगिरीच्या छायेत वावरत आहेत.
८ मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी पहिला मोठा लढा १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे लढला गेला. वस्त्र उद्योगातील हजारो महिलांनी कामाचे तास कमी करणे, महिलांच्या सुरक्षिततेचे अधिकार आणि समानता यासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. या संघर्षाच्या परिणामी १९१० मध्ये सरकारने ठराव मंजूर करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास मान्यता दिली.
परंतु, आजही महिलांसाठी वर्षातून केवळ एकच दिवस राखीव आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात उमटतो. स्त्रिया सक्षम असूनही त्यांना जुन्या विचारांच्या चौकटीत अडकवले जाते, ही समाजाची शोकांतिका आहे. संविधानाने स्त्री-पुरुषांना समान हक्क दिले असले तरी प्रत्यक्षात अजूनही महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्त्रियांना फक्त उपभोगाची वस्तू न मानता, त्यांच्या गुणांना व कर्तृत्वाला संधी मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलांनी आपल्या क्षमता, कौशल्ये आणि जिद्द वाढवून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणे गरजेचे आहे.
स्त्रीत्वाचा सन्मान करूया!
“आईच्या मायेने जीवन गोड होते, बहिणीच्या प्रेमाने उणीव भासते,
अर्धांगिनीच्या सोबतीने संसार उजळतो, आणि लेकीच्या जन्माने संपूर्ण विश्व पवित्र होते.”
जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!
– सविता गीरी, देवरी

