

सालेकसा , 08 मार्च : सालेकसा श्रेणी-1 अंतर्गत पशुपालक शिवणकर यांच्या “राजमाता” गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली व तिला जीवदान प्राप्त झाले. ही गाय गेल्या एक महिन्यापासून पोटफुगीच्या विकाराने त्रस्त होती. अनेक औषधोपचार करूनही तब्येत सुधारत नसल्याने पशुपालकांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, सालेकसा – डॉ. सचिन भाऊराव कोकोडे यांच्याकडे मार्गदर्शन मागितले.
गंभीर स्थितीत तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक
डॉ. कोकोडे यांनी गाईची प्रकृती पाहून तिला तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. पशुपालकांनी त्वरित संमती दिल्यानंतर डॉ. कोकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
या शस्त्रक्रियेदरम्यान गाईच्या पोटातून 12 ते 15 घमेले/किलो अपचन झालेला चारा, प्लास्टिक, तसेच लेदरचा कपडा काढण्यात आला. यामुळे गाईच्या आरोग्यात मोठी सुधारणा झाली आणि तिला जीवदान मिळाले.
पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम यशस्वी शस्त्रक्रियेसाठी कार्यरत
ही शस्त्रक्रिया डॉ. सचिन कोकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोहन मालकर व डॉ. बिलाल अली – पशुधन विकास अधिकारी यांनी पार पाडली. त्यांना सहाय्य करण्यासाठी म. खोटले – सहाय्यक पशुधन अधिकारी, विकास बडोले व कु. ललिता काळे – पशुधन पर्यवेक्षक आणि श्री. वाघाडे, कुळसंगे, तुमसरे (पट्टीबंधक) यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
राजमाता गाईला सरकारचा सन्मान व पशुपालकांचा आनंद
सरकारकडून ‘राजमाता’ दर्जा प्राप्त असलेल्या या गाईचे प्राण वाचवल्याने पशुपालक श्री. शिवणकर यांच्या परिवारात मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या शस्त्रक्रियेमुळे पशुपालन क्षेत्रात शास्त्रशुद्ध वैद्यकीय उपचारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
पशुवैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका जीवाची रक्षा झाली आणि पशुपालकांचा विश्वास अधिक दृढ झाला.






