अनुलोम संघटनेच्या वतीने शिव मंदिर सिव्हिल लाईन रिसामा येथे धार्मिक आयोजन
आमगाव : हिंदू धर्मातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या महाकुंभ मेळ्याचे तीर्थ दर्शन आता आमगावातही घडवून आणण्यात आले. अनुलोम (अनुगामी लोकराज्य महाअभियान) संघटनेच्या वतीने सिव्हिल लाईन रिसामा येथील शिव मंदिरात महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. प्रयागराज येथे 144 वर्षांनंतर संपन्न झालेल्या महाकुंभ मेळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ न शकलेल्या भाविकांना हा अध्यात्मिक लाभ मिळावा, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
स्टेशन रोड येथील शिव मंदिरातून सौ. उषा आशिष दुबे यांनी तीर्थ कलश महाराज यांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चार आणि भजन मंडळीच्या सहकार्याने तीर्थ कलशाची भव्य मिरवणूक काढली. या शोभायात्रेचा समारोप सिव्हिल लाईन रिसामा येथील शिव मंदिरात पोहोचल्यावर, समाजातील बांधव जोडप्यांनी जल कलशाचे विधिवत पूजन केले.
या पवित्र सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अनुलोम भाग जनसेवक अशोक शेंडे, स्थानमित्र रेखलाल टेंभरे, वस्तिमित्र दिलीप मेंढे, अनुलम मित्र महेश चुन्ने यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयामुळे कार्यक्रम भक्तिमय आणि शिस्तबद्ध पार पडला.
या धार्मिक सोहळ्यास आशिष दुबे, दुदीलाल गौतम, दिनेश चूटे, प्रेम पडोले, जनार्दन ब्राह्मणकर, टेकचंद कटरे, जनाबाई ब्राह्मणकर, मंगला टेंभरे, संकुतंला पडोळे, कौतिका गौतम, मनिषा कनपुरीया यांनी आपली उपस्थिती लावून भक्तीचा आनंद घेतला.
हिंदू संस्कृतीचा जागर – भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : या अनोख्या महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्यामुळे आमगावातील भाविकांना त्रिवेणी संगमाच्या पावन अनुभूतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. अनुलम संघटनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, हिंदू संस्कृतीचे संवर्धन आणि जनजागृतीसाठी हा सोहळा एक आदर्श ठरला आहे.

