होळी म्हणजे रंगांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण! पण आपण हा सण का साजरा करतो? आपण होळी दहन करतो, पूजन करतो आणि दुसऱ्या दिवशी विविध रंगांची उधळण करतो. यामागे एक पौराणिक कथा आहे, जी धर्माच्या विजयाचा आणि अधर्माच्या पराभवाचा संदेश देते.
होलिका कोण होती?
होलिका ही राक्षस राज हिरण्यकश्यपाची बहीण होती. तिला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की अग्नी तिचे काहीही नुकसान करू शकणार नाही. मात्र, ब्रह्मदेवाने तिला स्पष्ट इशारा दिला होता की जर तिने या वरदानाचा दुरुपयोग केला, तर ते निष्फळ ठरेल.
होलिकेचा गर्व आणि अधर्माचा मार्ग
हिरण्यकश्यपाचा पुत्र प्रल्हाद हा परम भक्त होता. तो नेहमी भगवान विष्णूचे स्मरण करत असे, त्यामुळे त्याचा पिता अत्यंत क्रोधित झाला. त्याने अनेक प्रकारे प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो वाचला. शेवटी, होलिकेने कपटाचा मार्ग स्वीकारला.
तिने प्रल्हादला मांडीवर घेतले आणि अग्नीत बसली, विचार केला की आपल्याला काहीच होणार नाही आणि प्रल्हाद मात्र जळून खाक होईल. ती आपल्या गर्वात हसू लागली आणि अग्नी पेटवण्यास सांगितले.
पण झाले उलटच! वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे होलिका स्वतः अग्नीत जळून राख झाली, आणि प्रल्हाद भगवान विष्णूच्या कृपेने सुरक्षित राहिला. हिरण्यकश्यपासाठी हा मोठा धक्का होता.
ही कथा आपल्याला शिकवते की अधर्म कितीही बलशाली वाटला, तरी शेवटी धर्माचाच विजय होतो.
“गर्वाचे घर नेहमी खालीच असते” – या म्हणीचा प्रत्यय होलिकेच्या विनाशातून येतो.
होळी व धुलीवंदन साजरे करताना घ्यावयाची काळजी
हा सण आनंद आणि सौहार्दाचा आहे, त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
नैसर्गिक रंगांचा वापर करा, रासायनिक रंग टाळा.
कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा देऊ नका.
पर्यावरणपूरक आणि जबाबदारीने हा सण साजरा करा.
होळी आणि धुलीवंदन आनंदाने, प्रेमाने आणि सकारात्मकतेने साजरे करूया. या सणाने आपल्या जीवनात रंग, प्रेम, आणि सुखसमृद्धी घेऊन यावी हीच प्रार्थना!
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
✍️ सविता गिरी

