होळी : रंगांचा आणि संस्कृतीचा सण

0
41

होळीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला, म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला होलिका उत्सव असेही म्हटले जाते. फाल्गुन महिन्यात ऋतुराज वसंताचे आगमन होते, त्यामुळे निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. या काळात सर्वत्र आनंदी वातावरण असते आणि यात्रा-उत्सवांना सुरुवात होते.

प्रांतीय विविधता : होळीचे वेगवेगळे रूप

भारताच्या विविध प्रांतांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो:

  • महाराष्ट्र – शिमगा
  • उत्तर भारत – दोला यात्रा किंवा होरी
  • दक्षिण भारत – वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण संध्याकाळी होळी पेटवण्याची परंपरा मात्र समान असते.

होळी का साजरी करतात?

होळी हा निसर्गातील बदल दर्शवणारा सण आहे. यावेळी हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू झालेला असतो. झाडांची जुनी पाने गळून नवीन पालवी फुटते. त्यामुळे पालापाचोळा आणि काड्या एकत्र करून होळी पेटवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

होळी पौर्णिमेची आख्यायिका

महाराष्ट्रात होळी साजरी करण्यासंदर्भात भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा सांगितली जाते.

हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीमुळे क्रुद्ध झालेल्या हिरण्यकश्यपूने त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

  • त्याला उंच कड्यावरून टाकले, पण तो वाचला.
  • उकळत्या तेलात टाकले, तरीही त्याला काही झाले नाही.
  • त्याची बहीण होलिका, जिला अग्नीपासून संरक्षणाचे वरदान होते, तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र जळून भस्म झाली.

ही कथा सत्याचा विजय आणि असत्याचा नाश याचे प्रतीक मानली जाते. त्यामुळेच होळी पेटवून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याची प्रथा आहे.

होळी सणाचा संदेश

होळी हा सण वाईटाचा अंत आणि चांगल्याचा विजय दर्शवतो. महाराष्ट्रात होळी पेटवल्यानंतर त्यात वाईट गोष्टींचा त्याग करून नवे संकल्प करण्याची प्रथा आहे.

✍️ संकलन : कोयलारे सर, गोरेगाव