
महिला दिनानिमित्त आमगाव येथे महिला पोलिसांचा सत्कार व होली मिलन सोहळा
आमगाव : महिला दिनाचे औचित्य साधून आमगाव येथे महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे शौर्य गाजविणाऱ्या महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विदर्भाध्यक्ष (प्रभारी) आरती जांगडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे हे समाजाचे प्राथमिक दायित्व आहे.”
संघटनेच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात संघटना कार्यरत आहे. पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. डीजी लोन संदर्भातील प्रलंबित मागणी मार्गी लागली असली तरी अजूनही अनेक ज्वलंत प्रश्न सोडवायचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला पोलिसांचा सत्कार व जयश्री पुंडकर यांना श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप पोलीस निरीक्षक जयश्री गव्हाणे होत्या. सत्कार समारंभापूर्वी संघटनेच्या स्वर्गीय विदर्भाध्यक्ष जयश्री पुंडकर यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयश्री गव्हाणे, महिला पोलीस शिपाई निशा मोहरले, नेहा वाढई, रेश्मा सोंजल (आमगाव) यांचा आरती जांगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
होली मिलन व विदर्भाध्यक्ष (प्रभारी) यांचा सत्कार
महिला दिन सोहळ्याच्या अनुषंगाने होली मिलन कार्यक्रमही उत्साहात पार पडला. यावेळी नव्या विदर्भाध्यक्ष (प्रभारी) आरती जांगडे यांचा उप पोलीस निरीक्षक जयश्री गव्हाणे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सविता गिरी (तालुका उपाध्यक्ष, देवरी), वंदना बैस (तालुका सचिव), सीमा मडावी (तालुका सचिव, देवरी) यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सविता गिरी मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष पुंडकर यांनी मानले.


