जागतिक ग्राहक दिनानिमित्त आमगाव येथे जनजागृती कार्यक्रम
आमगाव : आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांतून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आणि घटना समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार मोनिका कांबळे यांनी केले. त्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अन्नपुरवठा विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मार्च रोजी तहसील कार्यालय, आमगाव येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात ग्राहकपंचायतचे कोषाध्यक्ष प्राचार्य बी. एम. कटरे यांनी ग्राहक पंचायत आणि सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी ऑनलाइन फसवणुकीची उदाहरणे देत ग्राहकांनी कोणत्या बाबतीत अधिक जागरूक राहावे, यावर मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. मेश्राम यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 विषयी महत्त्वाची माहिती दिली. वस्तू किंवा सेवा विकत घेणारी किंवा भाडेतत्त्वावर घेणारी व्यक्ती ग्राहक मानली जाते, त्यामुळे ऑनलाइन, ऑफलाइन, तसेच टेलीमार्केटिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांनी सावध राहावे, असे त्यांनी सांगितले.
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार असलेल्या सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा आणि निवडीचा अधिकार, मत मांडण्याचा आणि तक्रार नोंदवण्याचा अधिकार, तसेच ग्राहक शिक्षणाचा अधिकार यासंबंधी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन अन्नपुरवठा निरीक्षक श्रीमती धपाटे मॅडम यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार ग्राहक पंचायतचे सचिव लक्ष्मण खंडाईत यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक पंचायतचे डॉ. अनिल मुंजे, सदस्य प्रदीप बिसेन, रमेश लिल्हारे, नरेंद्र बैठवार, संतोष पुंडकर, राजू मोदी आणि नारायण मेहर यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

