शुभम नगरात पाण्याचा अपव्यय; नागरिकांमध्ये संताप
आमगाव, दि. 20: आमगाव पाटबंधारे व्यवस्थापन शाखेअंतर्गत येणाऱ्या आमगाव वितरीकेवर काही अज्ञात इसमांनी (दि. 19) पहाटे 2 ते 3 च्या सुमारास वितरीकेचे द्वार जबरदस्तीने अधिक क्षमतेने उघडले. यामुळे अतिरिक्त पाण्याचा प्रवाह निर्माण होऊन वितरीकेचे मोठे नुकसान झाले. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीच्या पिकांचे आणि शेतात ठेवलेल्या जनावरांच्या निवाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक वाढलेल्या पाण्यामुळे शुभम नगर परिसरात पाणी साचून भगदाड पडल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी असून, पाण्याच्या अपव्ययावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
या वर्षीच्या नियोजनानुसार फक्त आमगाव व माल्ही मायनरला पाणीपुरवठा मंजूर असून, उन्हाळी पिकांसाठी नियोजनबद्ध पाणी सोडले जात आहे. मात्र, सिंचनासाठी लवकर पाणी मिळावे या हेतूने काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी वितरीकेचे मुख्य द्वार जबरदस्तीने उघडले. या कृतीमुळे वितरीकेच्या मजबुतीस धोका निर्माण झाला असून, कालव्यात भगदाड पडल्याने वितरीका फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाने तत्काळ आमगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेतील दोषींना शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
“पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार उन्हाळी पिकांसाठी पाणी ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि नियोजनानुसार सोडले जाते. मुख्य कालवा सुरू झाल्यानंतर पुच्छ भाग (टेल) पर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय वरच्या भागातील (हेड) मायनर (वितरिका) सुरू करता येत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा संतुलित राहतो आणि सर्व शेतकऱ्यांना समान प्रमाणात पाणी मिळते. या नियमानुसार आमगाव वितरिका नियोजनपूर्वक बंद ठेवण्यात आली होती.
मात्र, काही अज्ञात इसमांनी रात्री अपरात्री वितरीकेचे द्वार क्षमतेच्या बाहेर उघडल्याने अतिरिक्त पाण्याचा प्रवाह निर्माण झाला. परिणामी, वितरीकेला भगदाड पडले आणि काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सिंचन प्रक्रियाही विस्कळीत झाली असून, पाण्याचा अपव्यय होऊन भविष्यात वितरीका फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाटबंधारे विभागा मार्फत तातडीने दुरुस्ती करण्याबाबत ची कार्यवाही सुरू असून , लवकरच सिंचन सुरळीत होईल. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा आणि विभागाच्या नियोजनावर विश्वास ठेवावा. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच, या गैरप्रकाराबाबत आमगाव पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर कारवाईसाठी तपास सुरू आहे.”– कु. एस. एस. बहेकार
शाखा अभियंता, आमगाव

