
गोंदिया : जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील व खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे व MRDC चे अधिकारी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उड्डाणपूल व मेडिकल कॉलेजच्या कामांचा आढावा : गोंदिया-बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, मरारटोली-रिंग रोड, हड्डीटोली उड्डाणपूल किती टक्के पूर्ण झाले, याची माहिती घेण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या वेळापत्रकावर चर्चा झाली.
गोंदिया शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा : शहरातील नाट्यगृह, नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत, दुर्गा चौकातील पोलिस चौकीचे संथगतीने सुरू असलेले काम पाहून पालकमंत्री आणि खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नगरपरिषदेचे व्यापार संकुल, वाढीव पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, डंपिंग यार्ड, धोटे सुतिका गृह यांसारख्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्णय: नवेगाव, नागझिरा आणि बोदलकसा या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सोयी-सुविधांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठ्याच्या सूचना : जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील धानाची लागवड झाली आहे. मात्र, कृषी पंपांना वीजपुरवठा व्यवस्थित न झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आमगाव व अर्जुनी मोरगाव येथे वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना: झाशीनगर, रजेगाव-काटी आणि तेढवा-शिवनी यांसह अन्य सिंचन प्रकल्पांच्या प्रलंबित कामांना गती देण्यासंदर्भात चर्चा झाली. तांत्रिक अडचणी असल्यास त्या तत्काळ सोडवण्याचे निर्देश खासदार पटेल यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा आदेश : नागपूर-गोंदिया समृद्धी महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर करून जलद गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या प्रकल्पाबाबत विशेष बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
इतर महत्त्वाचे मुद्दे :
☑️गोंदिया येथे नवीन वसतिगृहासाठी जमीन अधिग्रहणाचा आढावा
☑️शासकीय धान खरेदी, बोनस आणि धान भरडाई प्रक्रियेचा आढावा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत भूमिगत गटार योजना व महावितरणच्या भूमिगत विद्युत लाईनच्या प्रलंबित कामांची पाहणी
या बैठकीत जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री आणि खासदार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


