

संयम, धैर्य आणि निडरतेच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते
देवरी: “महिलांनी स्वतःला सदैव प्रेरित ठेवले आणि ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले, तर त्यांना कधीही अपयश येणार नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी संयम, धैर्य आणि निडरता अनिवार्य आहे. सध्याच्या काळात महिलांसाठी वकिली हा उत्तम व्यवसाय असून, यातून समाजात मानसन्मान मिळतो आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविता येते,” असे प्रेरणादायी विचार न्यायाधीश सुलभा चरडे यांनी व्यक्त केले.

त्यांची देवरी येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयातून पदोन्नती झाल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भ अध्यक्षा आरती जांगडे यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना आरती जांगडे म्हणाल्या, “मॅडम देवरी येथे असताना महिलांना कायद्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या. त्यांनी महिलादिनी देखील उपस्थित महिलांना कायद्याची सविस्तर माहिती देत न्याय हक्कांबाबत जागरूक केले. आज आपण पदोन्नतीमुळे येथे नसणार असलो तरी भविष्यातही मार्गदर्शन मिळावे,” अशी विनंती त्यांनी केली.
सत्कार समारंभास संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मी मेश्राम, उपाध्यक्ष सविता गिरी, सचिव सीमा मडावी, तसेच अधिवक्ता विमल बारसे, अधिवक्ता प्रीती मस्करे, अधिवक्ता रूपाली संगीडवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश सुलभा चरडे यांनी महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा, वकिली क्षेत्रातील संधी ओळखून पुढे जावे, असे सांगितले. त्यांचे प्रेरणादायी विचार आणि समाजहिताची बांधिलकी यामुळे उपस्थित महिलांना नवी ऊर्जा मिळाली.






