‘ध्येयरत्न’ पुरस्काराने वशिष्ठ खोब्रागडे सन्मानित

0
432
1

आय एम विनर राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात पुण्यात गौरव सोहळा

गोंदिया, दि. 29 : पुण्यातील विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आय एम विनर’ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात वशिष्ठ खोब्रागडे यांना प्रतिष्ठित ‘ध्येयरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अर्चना सुदाम शेंडगे आणि प्रमुख पाहुणे सहायक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांच्या हस्ते त्यांना सपत्नीक गौरवण्यात आले.

ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन व ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत या परीक्षेची संधी पोहोचवण्यासाठी वशिष्ठ खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. मागील दोन वर्षांत 600 हून अधिक विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी होता यावे, यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘ध्येयरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

सन्मानामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा

गोंदिया जिल्ह्यातील ध्येय प्रकाशन अकॅडमीचे जिल्हाप्रमुख म्हणून वशिष्ठ खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल जिल्ह्यातील शैक्षणिक व सहकारी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्यास नवी ऊर्जा मिळाली असून, त्यांनी भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक संधी निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Previous articleसहकारी हक्कांवर आघात ! गोंदियात सहकारी संस्थांचा विराट एल्गार
Next articleगुडीपाडव्याच्या निमित्ताने शाळेत ‘प्रवेश वाढवा’ उपक्रमाचा उत्साह